हरि म्हणजे विष्णु, हर म्हणजे महादेव तर पितामह म्हणजे ब्रम्हा. आधी सांगितलेल्या तीन देवता व सूर्य या चारही देवता एकाच मूर्तीत दिसतात.
सूर्य, ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे चारही देव प्रसिद्ध असून ते इतर देवतांद्वारा पूजनीय आहेत. सृष्टीची उत्पत्ती आणि तिच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारणारी ही चारही तत्वे या एकाच मूर्तीत पाहायला मिळतात.

सूर्य हरिहर पितामह


देवतमुर्तीप्रकरण मध्ये आलेला एक श्लोक पाहून या मूर्तीची कल्पना आपण करू शकतो.

चतुर्वक्त्रमष्टबाहुं चतुष्कैकनिवासिनम्

ऋद्धा मुखगतः कार्यः पद्महस्तो दिवाकरः ॥

खट्वाङ्ग त्रिशूलहस्तो रुद्रो दक्षिणतः शुभ: ।

कमण्डलुश्चाक्षसूत्रमपरस्थः पितामहः ॥

शङ्खचक्रधरो हरिर्वामे चैव तु संस्थितः ।

एवं विधोऽयं कर्त्तव्यः सर्वकामफलप्रदः ॥

वरील श्लोकाप्रमाणे ही मूर्ती एकच आसन आणि एकच शरीर धारण करणारी दाखवावी. ही मूर्ती आठ हातांची तर चार मुखांची असावी. हातात कमळ घेऊन समोर मुख असणारा सुर्य तर उजवीकडे खट्वांग आणि त्रिशूल धारण केलेला शिव असावा. पाठीमागे चेहरा असलेला व हातात कमंडलू आणि अक्षमाला घेतलेला ब्रम्हा दाखवावा.
डावीकडे शंख आणि चक्र घेऊन विष्णु असतो. अशा तऱ्हेने बनविलेली मूर्ती सर्व मनोकामना पूर्ण करणारी असते.
असाच काहीसा उल्लेख अपराजितपृच्छा मध्ये मिळतो. पण इथे या मूर्तीला हरिहर हिरण्यगर्भ असे म्हटले आहे.

हरो हिरण्यगर्भश्च हरिर्दिनकरोऽपि च ।

एते देवाः समाख्याता देवनामपि पूजिताः ॥

पृथक्त्वेन च कर्तव्या एकरूपसमन्विताः।

अष्टबाहुचतुर्वक्त्रः कुण्डली मुकुटोज्ज्वलः ॥

हारकेयूरसंयुक्तो रत्नमालोपशोभितः ।

ऋष्यागतपुरः कार्य: पद्महस्तो दिवाकरः ॥

शङ्खचक्रधरो देवो वामे च मधुसूदनः ।

कण्ठाभरणसंयुक्तो मूर्धा च मुकुटोज्ज्वलः ॥

ब्रह्मा पश्चिमतः कार्यों बृहज्जठरमण्डलः ।

कुण्डिकामक्षसूत्रं च दधत् कूर्चविभूषितः ॥

या मूर्तीला ब्रह्मेशानजनार्दनार्क हे नाव रुपावतार मध्ये दिलेले आहे पण इतर लांच्छन आणि क्रम वरीलप्रमाणेच आहे.

सदरची मूर्ती गुजरात राज्यातील, चंपानेर जवळ असणाऱ्या लकुलिश शिव मंदिरातील आहे. आमचे परममित्र तुषार कोडोलीकर यांनी हे छायाचित्र काढले आहे. ही मूर्ती तंतोतंत वरील उल्लेखाप्रमाणे नाही म्हणजेच हातातील वस्तू थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत. जिथं ब्रम्हाच्या हातात कमंडलू सांगितला आहे तिथे या मूर्तीत पुस्तक आहे. कमंडलू आणि पुस्तक दोन्ही ब्रह्माचे लांच्छन असल्याने ओळख पटणे सोपे जाते.

आज जितक्या मोठ्या प्रमाणात महादेव आणि विष्णूची पूजा होते तितक्याच मोठ्या प्रमाणात सूर्याची देखील होत होती.


विभ्राड् बृहत्पिबतु सोम्यं मध्वायुर्दधद्यज्ञपतावविहुतम् |

वातजूतो यो अभिरक्षति त्मना प्रजाः पिपर्ति बहुधा वि राजति ||


शैव आणि वैष्णव यांच्या प्रमाणे पूर्वी सौर संप्रदाय देखील अस्तित्वात होता. दरम्यान फक्त सूर्याची अनेक मंदिर बांधली गेली पण कालच्या ओघात सूर्योपासना कमी झाली आणि शैव, वैष्णव संप्रदाय भरभराटीस आला. सूर्य पंचायतन मध्ये शिव आणि विष्णु यांचा समावेश असतो.
सदरच्या मूर्तीत समोर फक्त सूर्याचाच चेहरा आहे. सूर्यातच  ब्रम्हा-विष्णू-महेश आहेत अशी कल्पना इथे केलेली दिसते.