वायुपुराणातील मतानुसार हा शिवाचा अठ्ठावीसावा अवतार समजला जातो तसेच हा श्रीकृष्णाचा समकालीन होता अस देखील म्हटलं जातं. शिवाच्या प्रतिमा रूपातील हा अवतार असून त्याने पाशुपत मताची स्थापना केली. एका मान्यतेनुसार विश्वरचेता ब्रम्हा ते सूक्ष्म जीव हे सर्व प्राणी आहेत व त्यांना शिवाचे पशू म्हटलं जातं. या सर्व पशुंचा पती असल्याने भगवान शंकरांना पशुपती म्हटलं आहे.

याचे मुख्य लक्षण म्हणजे हातात असणारा लाकडी सोटा आणि याचे उर्ध्व लिंग म्हणजेच याचे लिंग वरच्या दिशेला असते.
सर्वच ठिकाणी हा आसन अवस्थेत म्हणजे बसलेला असावा अशी कल्पना केली आहे पण काळाच्या ओघात याच्या स्थानक मूर्ती देखील घडवलेल्या पाहू शकतो.
विश्वकर्मावतारवास्तुशास्त्र मध्ये आलेल्या उल्लेखानुसार हा  पद्मासनात असतो तसेच हातात म्हाळुंग आणि सोटा असून उर्ध्वलिंगी असतो असा संकेत आहे. मुळात लकुलिश ध्यानाच्या अवस्थेत असल्याने तो स्थानक असतो.
उदाहरणादाखल घेतलेल्या दोन्ही मूर्ती या बदामी जवळ असणाऱ्या महकुटा मंदिर समूहातील आहेत.

वरील सर्व संकेतांना फाटा देत या दोन्ही मूर्ती बनविल्या आहेत. दोन्ही मूर्तींच्या हातात परशू असून जटाभार आहे. जटा आणि उर्ध्व लिंग यावरून हा लकुलिश आहे हे आपण सांगू शकतो. एकाच्या हातात कमंडलू आहे तर दुसऱ्याचा हात वरदमुद्रेत आहे.



श्रशिवमहापुराणात शिवाच्या अठ्ठावीस अवतारांचा उल्लेख आहे तो खालील प्रमाणे.
श्वेतः सुतारो मदनः सुहोत्रः कङ्क एव च ।
लौगाक्षिश्च महामायो जैगीषव्यस्तथैव च ॥
दधिवाहश्च ऋषभो मुनिरुग्रोऽत्रिरेव च ।
सुपालको गौतमश्च तथा वेदशिरा मुनिः ॥
गोकर्णश्च गुहावासी शिखण्डी चापरः स्मृतः ।
जटामाली चाट्टहासो दारुको लागुली तथा ॥
महाकालश्च शूली च दण्डी मुण्डीश एव च।
सहिष्णुः सोमशर्मा च लकुलीश्वर एव च ॥
एते वाराहकल्पेऽस्मिन् सप्तमस्यान्तरे मनोः ।

अष्टाविंशतिसंख्याता योगाचार्या युगक्रमात् ॥

अर्थात,
श्वेत, सुतार, मदन, सुहोत्र, कंक, लौगाक्षि, महामायावी जैगीषव्य, दधिवाह, ऋषभ मुनि, उग्र, अत्रि, सुपालक, गौतम, वेदशिरा, मुनि, गोकर्ण, गुहावासी, शिखण्डी, जटामाली, अट्टहास, दारुक, लांगुली, महाकाल, शूली, दण्डी, मुण्डीरा, सहिष्णु, सोमशर्मा और नकुलीश्वर असे हे क्रमाने अठ्ठावीस अवतार होतात.
पैकी नकुलिश हा शेवटचा अवतार कायावरोहण या तीर्थस्थळी झाला. ज्या पाशुपत संप्रदायाचा पुरस्कार लकुलिश ने केला त्यांची साधना देखील तितकी कठीण असते. साधकांसाठी खालील संकेत गणकरिका नामक मिळतात ते असे
वासचर्या जपध्यानं सदारुद्रस्मृतिस्तथा ।
प्रसादश्चैव लाभानामुपाया: पंच निश्चिता।।

म्हणजेच
निवसाच्या स्थानाची काळजी घ्यावी, जप, ध्यान करावे. सदैव एकलिंगाचे ध्यान आणि स्मरण करावे.
असा हा एक शिवाचा अपरिचित अवतार.