Ticker

6/recent/ticker-posts

अनंतपुर: ५ वर्षात नामशेष होऊ शकतो हा भुईकोट

जवळपास अडीच वर्षांपूर्वी याच heading ने अनंतपुर भुईकोटाविषयी एक छोटा माहितीवजा लेख लिहला होता. त्यावेळी केलेले भाकीत आज खर होताना दिसतंय. फक्त अडीच वर्षात लोकांनी किल्ल्याचे जवळपास पन्नास टक्के नुकसान केले आहे.

दरवाजा



वर दिलेला फोटो पाहून अडीच वर्षांपूर्वीचा भुईकोट आणि आताचा भुईकोट यातील फरक स्पष्ट जाणवू शकतो.
डावीकडे आणि उजवीकडे असणारे भरीव बुरुज आज आतून पोकळ आणि पाडलेले दिसतात. दरवाजा समोर असणारा बुरुज आधी उंच आणि आतून भरीव होता आज तो आतून रिकामा आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणारे अनंतपूर हे लहान गाव. खरे तर हे गाव कर्नाटक हद्दीत येते व खिळेगाव बसवण्णा पासून अवघ्या ११ किमी वर आहे. गावाच्या एका कोपऱ्यात ८ बुरुजांचा भुईकोट असून त्याचा आकार लहान पण देखणा आहे.

Google मॅप वरून २०१८ साली घेतलेल्या फोटोत पाहून त्याचा अंदाज येतो.

भुईकोटला ३०-४० फुट उंचीचे बुरुज आहेत व त्याला समांतर असा खंदक खोदला आहे. खंदक जवळपास  २० फूट रुंदीचा असावा. महत्वाची गोष्ट अशी की हा खंदक पूर्ण बांधीव आहे. भुईकोटात सर्वत्र बाभळीचे रण माजले आहे, त्यात भर म्हणून गावातल्या लोकांनी त्याची हागणदारी केलेली दिसते. किल्ल्याच्या आवारात लहान-लहान पोरं जुगार खेळत बसलेली असतात. असो... ८ बुरुजांपैकी १ बुरुज शाबूत होता त्याची माती देखील आता गायब आहे. बाकी बुरुज तेंव्हाच पाडले गेले. कोटाची पांढरी माती येथील लोक ट्रॅक्टर ने भरून नेतात, त्यासाठी भुईकोट पूर्ण उकरून टाकलेला दिसतो.




भुईकोटाचा आकार खूप सुंदर आहे. याला एकूण ४ दरवाजे होते, त्यापैकी दुसरा भव्य आहे. हा महादरवाजा असावा. चार पैकी पहिला व चौथा पूर्ण नामशेष झाले आहेत. बुरुजांची बांधणी पांढऱ्या मातीच्या विटात केलेली दिसते. बुरुजाला समांतर असणारा खंदक व त्यामुळे गढीला प्राप्त झालेला फुलाचा आकार मनमोहक वाटायचा. आज रोजी ते दिसत नाही.

याच्याविषयी इतिहासात खूप थोडे उल्लेख येतात.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा यात अनंतपुर घेतल्याची नोंद आहे. ती खालीलप्रमाणे
.....दादासाहेबास आणावयास चिंतो अनंत पाठविले. त्याजवरून दादासाहेबी आनंदवल्लीहून कूच करून दरमजल कर्नाटकास आले व रावसाहेब माघारे फिरोन सामोरे गेले. भेटी होऊन, बेदरचे झाडीत शिरोन, अनंतपूरचे किल्ल्यास मोर्चे देऊन जेर केला. हैदरखान बेदरच्या आश्रयास गेले. फौज, प्यादे व गाडदी पळोन गेले. दोन अडीच हजार फौज व आठदहा हजार गाडदी प्यादे राहिले. दोन बाऱ्या टाकून गेले, तसे आणखी एक बारी गेल्यानें हैदरखानाचें पारिपत्य व्हावें, असा समय असतां हैदरखानांनीं दादासाहेबांकडे दोघां चौघांचे हातें राजकारण करून तह करार केला....

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीस मध्ये राजवाड्यांनी ११ सप्टेंबर १७७९ मधील एक पत्र प्रकाशित केले आहे त्यात अनंतपुर चा उल्लेख फक्त स्थळनिश्चिती साठी केलेला दिसतो.
...राजश्री गंगाधरराव नाना यांची भेट मौजे अनंतपूरनजीक आथणी येथें जाहाली. समागमें स्वार घ्यावयाचे ते त्याजपासून घेऊन येथें आलों. उदईक येथून कूच करून लांब लांब मजलीनें पुढें जात असों....


तीर्थरूप



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या