अर्धनारी नटेश्वर वेळापूर:-
वेळापूरला सुंदर अशी महादेवाची मूर्ती आहे हे ऐकुन होतो पण ती इतकी सुंदर आहे हे प्रत्यक्ष पहिल्यावरच समजले. अतिशयोक्ती न करता मूळ मूर्तीचं विश्लेषण पाहू.
अर्धनारी नटेश्वर का? इथल्या लोकांच्या मते लिंगाचा जो भाग आहे त्यात शंकर आणि पार्वती दोन्ही कोरले आहेत म्हणून हा अर्धनारी. शिवपिंडी च्या खालील भागाला पिठ म्हणतात व त्यावर जो गोल किंवा उभट आकाराला लिंग किंवा बाण म्हणतात.
शंकराने एक डावा हात पार्वतीच्या कमरेवर ठेऊन नाजूक आलिंगन दिले आहे, दुसऱ्या डाव्या हातात ५ फण्यांचा शेषनाग तर एका उजव्या हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या उजव्या हातात अक्षमाळा आहे. पार्वतीचा उजवा हात शंकराच्या खांद्यावर व डाव्या हातात कमळ आणि पाश आहे. शंकराच्या पायाशी नंदी व भृंगी ऋषी आहेत. त्यांची मूर्ती ही अस्थिपंजर, अशक्त रूपात उभी दिसणारी आहे, पार्वतीच्या पायाशी घोरपड व गणेशाची मूर्ती कोरली आहे.
शंकर पार्वतीच्या अंगावरील दागिने अत्यंत बारीक कोरलेले आहेत. मग ते पैंजण असो किंवा मेखला किंवा पार्वतीचा बुचडा कोरीवकामात मुर्तीकाराने कस लावला आहे. शिवपार्वतीच्या वरच्या बाजूला किर्तीमुख व तोरण आहे ज्यात अष्ट देवता आहेत जसं की ब्रम्हदेव, चार यम इंद्र, वरूण, कुबेर, ईशान.
शिवाच्या कानात कर्णफुल व मुकुटावर चंद्र- सूर्य कोरले आहेत.
मूर्तीत जास्त लक्ष वेधलं जातं ते शिवपार्वतीच्या चेहऱ्याकडे. दोघांचाही गोंडस चेहरा आणि त्यावरील स्मितहास्य वाह! संपला विषय.
अर्धनारीनटेश्वर वेळापूर |
गणपती, अर्धनारीनटेश्वर वेळापूर |
वेळापूर मध्ये मंदिरांचा व इतर पुरातन वास्तूंचा समूह आहे. अंबाबाई मंदिर, कांचन महाल, नाथ मंदिर, खंडोबा मंदिर, काळा मारूती, मल्लसेठीचे स्मारक इत्यादी प्राचिन मंदिर इथ आहेत.
पैकी काही ठराविक मंदिरे सुस्थितीत आहेत तर इतर मंदिरांची दयनीय अवस्था बघवत नाही. मंदिराच्या चौकटीवर आपणाला जिथं सर्रास गणपती(गणेशपट्टी) बघायला मिळते पण इथल्या मंदिरांच्या चौकटीवर गजलक्ष्मी आहे. गणेशपट्टीच्या जागी गजलक्ष्मी दक्षिणेत पाहायला मिळतात.
मंदिराच्या परिसरात सप्त मातृका, चंडिका गणेशमूर्ती, विष्णु अशा नानाविध मुर्ती पाहायला मिळतात.
इतिहास:
इतिहास म्हटलं की पुरावे आलेच, आणि पुराव्याच्या आधारे बोलायचं तर यादवकालीन पुरावे वेळापूर गावाच्या वैभवावर प्रकाश टाकतात. यादवकाळात वेळापूर एकचक्र नगर नावाने प्रसिद्ध होते.
वेळ म्हणजे सीमा आणि पुर म्हणजे अशी जागा जीला तटबंदी आणि बुरुज आहेत. शिवपार्वती मंदिरातील शिलालेख खूप गोष्टी उलगडून जातो. यादवकाळात वेळापूर भागावर बाईदेवराणा याला नेमले होते. वटेश्र्वर नामक मठ बाईदेवराणा याने करमुक्त केला होता. शिवपार्वती किंवा अर्धनारी नटेश्र्वर मंदिराचा जीर्णोध्दार यानेच केला. शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते. पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा, गाभार्यात पिंड व आतील नंदी, तो ही उघड्यावर एवढेच असावे. नंतर सर्व बाजूंनी जीर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी. इतक्या नोंदी पाहता हे यादवांचे लष्करी ठाणे असावे हे नक्की.
1 टिप्पण्या
Khup Sunder.. Kiti diwas aamhi Solapur la rahat hoto but kadhicha ya sunder thik ani jane zale nahi.. Thanks Onkar. Khup sunder aahe mandir.
उत्तर द्याहटवा