भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात
"मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्।"
म्हणजेच प्राण्यांमध्ये मी सिंह आहे तर पक्ष्यांमध्ये मी विनतापुत्र गरुड आहे.गरुडाला पक्षांचा राजा मानलं जात.
गरुड म्हणजे भगवान विष्णू यांचं वाहन. शिल्प शास्त्रात वाहन महत्वाची भूमिका बजावतं. काही ठिकाणी फक्त वाहन बघून मूर्तीची ओळख होते उदा. जैन तीर्थंकर सर्व सारखे दिसतात पण त्यांच्या वाहनावरून त्यांची ओळख होऊ शकते.
नागांतक, वैनतेय, विष्णुरथ, सुपर्ण, पक्षिराज, गुरुत्मन अशी काही गरुडाची नाव आपणाला पाहायला मिळतात.
विष्णु चे वाहन असणारा हा गरुड जेंव्हा मूर्ती रुपात येतो तेंव्हा मात्र त्याचे सौंदर्य कैक पटीने वाढते.
गरुडाचा जन्म
गरूड आणि साप यांचं हाडवैर त्यांच्या जन्मापासूनच आहे. त्याविषयी एक कथा आहे ती पुढीलप्रमाणे.
महर्षी कश्यप यांना दोन पत्नी एक विनता तर दुसरी कद्रू. दोघींमध्ये श्रेष्ठत्वावरून चुरस लागली. दोघींनी कश्यपांकडे त्यांनी वरदान मागितले ते पुत्रप्राप्तीचे. ईर्ष्या पराकोटीला गेली आणि दोघींमध्ये असा ठराव झाला "जीचे पुत्र बलशाली नसतील ती दासी म्हणून राहील". वरदान मिळाल्याप्रमाणे दोघींना मुल होणार होती ती अंडज म्हणजे अंड्यातून होणार होती.
कद्रू च्या अंड्यातून साप जन्माला आले पण विनताची अंडी अजून तशीच होती. विनता ने एक अर्धपक्व अंड स्वतः फोडलं व त्यातून अर्धपक्व अशा मुलाचा जन्म झाला. तोच हा अरूण. अरुणाने आपल्या आईला श्राप दिला की तू घाईगडबडीत अंडं फोडलं आहे तर तुला तुझा संपूर्ण आयुष्य दासी म्हणून जगावं लागेल. त्यातून तुझी सुटका फक्त तुझा दुसरा पुत्र करू शकेल. त्यानंतर विनता बराच काळ कद्रू ची दासी बनून होती. पुढे दुसऱ्या अंड्यातून एक पुत्र जन्माला तो म्हणजे गरुड. आपल्या आईला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी त्याने सापाला विचारले तर त्यांनी याबदल्यात अमृत आणून देण्यास सांगितले. गरुडाने स्वर्गातून अमृत कलश मिळवला पण वाटेत त्याला विष्णु आणि इंद्रदेव भेटले. अमृत कलश सापांना भेटला तर काय होईल याची जाणीव गरुडाला करून दिल्या नंतर तो सकुशल परत आणून देण्याची तयारी गरुडाने दाखवली. इंद्राने त्याला भोजन म्हणून साप खाता येईल असा वर दिला तर विष्णूने त्याला आपले वाहन बनण्याचा वर देऊन त्याला आपल्या ध्वजावर स्थान दिले. हा गरुडध्वज आपण बऱ्याच शिल्पात पाहू शकतो.
![]() |
कृष्णाच्या रथावरील गरुडध्वज |
गरुडाने अमृत कुंभ सापांसमोर ठेवला व आपल्या आईला मुक्त करून घेतले. सापांना सांगितले की अमृत प्राशन करण्याआधी अंघोळ करावी. त्याचदरम्यान चलाखी दाखवत इंद्राने तो कलश पळवून आणला आणि स्वर्गात ठेवला. अशा प्रकारे गरुडाने आईला पण सोडवले व अमृत कुंभ पण सापांच्या हाती नाही लागू दिला.
अरूण सुर्याचा सारथी झाला तर गरुड विष्णूचे वाहन बनला. सम्पाती आणि जटायू हे याच अरूण ची मुलं. सूर्याला स्पर्श करण्याच्या इच्छेने या दोघांनी गगनात भरारी घेतली पण काही क्षणात च जटायू मूर्च्छित होऊन खाली पडला तर सम्पाती सूर्याच्या दिशेने जात राहिला. काही वेळात सूर्याच्या प्रखरतेने सम्पातीचे पंख जळून गेले आणि सम्पाती समुद्र किनारी पडला.
रामायणातील गरुडाची भूमिका
श्रीराम यांनी लंकेवर स्वारी केली तेंव्हा रावणाचा मुलगा मेघनाथ याने प्रभू श्री राम आणि लक्ष्मण यांना नागपाशाच्या साहाय्याने बांधले. त्यावेळी हनुमानाच्या विनंतीवरून गरुडाने दोघांना नागपाशातून मुक्त केले.
तसेच जेंव्हा राम वनवासात होते तेंव्हा पंचवटीच्या वाटेवर त्यांना एक विशाल महाकाय पक्षी भेटला. त्याचा परिचय दिल्यानंतर त्याचे नाव जटायू असल्याचे समजले.
जटायू रामास म्हणतो,
सोह वाससहायरते भविष्यामि यदीचासि ।
सीता त तात रविष्ये त्वयि याते सलक्ष्मणे ॥
अर्थात, तुझी इच्छा असेल तर मी तुला सहाय्य करेन, लक्ष्मणा सोबत तू बाहेर गेला तर मी सीतेचे रक्षण करीन.
स तत्र सीता परिदाय मैथिली सहैव तेनातिबलेन पक्षिणा ।जगाम तां पंचवटी सलक्ष्मणो रिपून्दिधायन श बनानि पालयन् ॥
सीतेचे रक्षण करण्याचा हेतूनेच राम त्या विशाल पक्ष्यासह निवासाची जागा शोधण्यास पुढे गेले.
![]() |
रावण आणि जटायू युद्ध |
याच दरम्यान रावण सीतेला पळवून नेत होता तेंव्हा जटायू ने रावणासोबत युद्ध केले व त्यात जटायू चा मृत्यू झाला.
पारिजात वृक्षाची कथा दर्शविणारे शिल्प
सदरचे शिल्प प्रवरा संगम येथील मंदिरावरील आहे. या शिल्पात आपण पाहू शकतो की गरुडाच्या पाठीवर एक झाड आहे ते म्हणजे पारिजात असून त्याच्या डाव्या हातात भगवान श्रीकृष्ण तर उजव्या हातात सत्यभामा आहे.
![]() |
श्रीकृष्ण, सत्यभामा आणि पारिजात घेऊन जाताना गरुड |
त्याची कथा पुढीलप्रमाणे, द्वापारयुगात नरकासुराने उच्छाद मांडला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून इंद्राने भगवान श्रीकृष्णकडे मदत मागितली. कृष्ण सत्यभामेसह गरुडावर आरूढ होऊन नरकासुराच्या प्रागज्योतिष पुरत गेले, तिथे नरकासुराचा वाढ करून १६ सहस्त्र स्त्रियांची कृष्णाने मुक्तता केली व माता अदितीची कुंडले घेऊन ते स्वर्गात गेले. स्वर्गातील पारिजात वृक्ष सत्यभामेने पहिला ज्याची साल सोन्याची होती आणि त्याला विलक्षण सुगंध होता. बायकोच्या हट्टासाठी श्रीकृष्णांनी पारिजात हा वृक्ष घेतला आणि गरुडाच्या पाठीवर ठेवला. इंद्राने श्रीकृष्णांना विरोध केला पण इंद्र पराभूत झाला आणि पारिजात वृक्ष घेऊन श्रीकृष्ण पृथ्वीवर आले.
शिल्पाची माहिती दिल्याबद्दल अभजित इंगळे यांचा मी आभारी आहे.
गरूड शिल्प
विष्णु शिल्प म्हटलं की शेजारी गरुड शिल्प हे समीकरण ठरलेलं आहे. गरुडाच्या शिल्पात देखील खूप वैविधता आढळते. विष्णुच्या यानक प्रकारातील मूर्तीमध्ये भगवान विष्णू गरुडावर बसलेले दाखविले जातात.
इतर ठिकाणी गरुड हा उभा असून अंजली मुद्रेत उभा दिसतो. यातील सर्वात उत्तम उदाहरण बेलूर येथील चन्नकेश्वरा मंदिरात बघता येते.
![]() |
अंजली मुद्रेतील गरुड, बेलूर |
शिल्प शास्त्रात गरुड शिल्प चार हातांचे बनवावे असं सांगितलं आहे पैकी वरील दोन हातात छत्र व कलश तर इतर दोन हात अंजली मुद्रेत असावेत. गरुडाचा रंग हिरवा असावा, डोळे आणि चेहरा गोलाकार तसेच नाक घुबड पक्ष्या प्रमाणे असावे.
2 टिप्पण्या
खूप सुंदर माहिती ,मला pdf मेलेलं का
उत्तर द्याहटवामाहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवा