ठाणे जिल्ह्यातील भिवंडी म्हणजे औद्योगिक क्षेत्र असणारे शहर. इथे ज्या प्रकारे आधुनिक क्षेत्र उदयास आले त्याप्रमाणे ऐतिहासिक महत्व देखील होते याची जाणीव भिवंडी भागात फिरस्ती करताना होते. लोनाड मधील लेण्या, मंदिरे असो किंवा काही वर्षापूर्वी दिंडीगड येथे सापडलेले पुरातन शिव मंदिर.
आतुन भुयार |
भूयाराचे अंदाजे आरेखन |
सुट्टी नक्की कशी मार्गी लावावी याचा विचार करत करत लोनाड करावे हा विचार आला आणि काळा सुर्ज्या किंवा कोक्या (सूरज कोकितकर) याने दिंडीगड येथे जुने मंदिर सापडले आहे ते बघू असा ठराव मांडला आणि सर्वानुमते म्हणजे आमच्या दोघांच्या मताने संमत पण झाला. दिंडीगड येथील मंदिर पाहून झाले आणि निघायच्या वेळी पुजाऱ्याला सहज विचारले की "हा रस्ता कुठे जातो" तेंव्हा त्यांनी सांगितलं की गुहेत. एक उत्सुकता म्हणून त्यांच्या मागे गेलो आणि पुढे जे काही दिसले ते पाहून आश्चर्य वाटले. मंदिराच्या डोंगरात एक ब्रिटिशकालीन भुयार आहे. भूयाराचे नक्की प्रयोजन समजत नाही पण आतील बांधकाम आणि व्यवस्था यावरून तरी पाण्यासाठी केलेले असावे अशी शक्यता आहे. बरीच पडझड झाली असल्याने जवळपास पाच फूट उंच आणि चार फूट रुंदीचे हे दगडी भुयार नक्की कुठे चालू होते आणि कुठे संपते याचा सुगावा लागत नाही. डोंगरात ज्या ज्या ठिकाणी ओढे दिसतात तिथे पुल बांधून त्यावर दगडी भुयाराचे काम सुरू ठेवलेले दिसते. जमीन खोदून त्यात भक्कम पाया आणि त्यावर परत दगडी बांधकामाचे हे भुयार बांधले आहे. काही ठिकाणी लहान दरवाजे आणि त्यांची उघडझाक करण्यासाठी केलेली व्यवस्था अवाक् करते.
पुलावरील ढासळलेला भाग |
भुयार |
प्रयोजन:
नक्कीच याचा वापर गुप्त मार्ग म्हणून करत नव्हते कारण आधी सांगितल्याप्रमाणे पुलाच्या ठिकाणी हे दगडी बांधकाम सहज ओळखून येते पण इतर ठिकाणी हे शक्य नाही.
दुसरा महत्वाचा मुद्दा, जसे धरण बांधून त्यावर रस्ता बनवितात त्याप्रमाणे भुयार बांधून परत त्यावर रस्ता केलेला आहे म्हणजेच हे भुयार नक्कीच एक मार्ग म्हणून वापरले नसणार.
पुलावरील भुयार |
आतील भागात काही ठिकाणी लोखंडी गज आणि इतर T आकाराचे लोखंडी अँगल दिसतात ज्यांचा वापर दरवाजासदृश ठिकाणी केलेला आहे. या दरवाजाची बांधणी धरणाच्या दरवाज्याप्रमाणे वरून खाली सोडता येतील अशी वाटते.
या भुयारात हवा खेळती रहावी अशा काही सोयी दिसत नाहीत परंतु आज रोजी बऱ्याच ठिकाणी पडझड झाली असल्याने आपण आतून फेरफटका सहज मारू शकतो.
भुयारातील दरवाजा |
ढासळलेला भाग |
5 टिप्पण्या
Great👏
उत्तर द्याहटवाजबरदस्त.
उत्तर द्याहटवाअप्रतिम भटकंती आणि सापडलेल भुयारही
उत्तर द्याहटवादादा, लै भारी माहिती 💓💓💓
उत्तर द्याहटवाकदाचित पाणी पुरवठा करण्याची कॅनाल सारखे वाटत आहे.
उत्तर द्याहटवा