अंधकासुरमर्दन - अंधकासूरवध
गजासुरवध, त्रीपुरांतक प्रमाणे अंधकासुरवध हा देखील महादेवाच्या संहार मूर्तीतील प्रकार आहे. याच्या विषयी कथा शेवटी दिली आहे.
खाली दिलेल्या मूर्ती पैकी पहिली मूर्ती हळेबिडू मधील आहे.
( Tap on the image to see in full resolution.)
( Tap on the image to see in full resolution.)
![]() |
| हळेबिडू |
शंकराने दोन हातात त्रिशूळ धरले असून त्याच्या टोकावर अंधकासुर नावाचा राक्षस आहे. अंधकासुराने हातात ढाल आणि तलवार घेतली आहे. महादेवाच्या इतर हातात धनुष्य, बाण, खटवाक, डमरू, पात्र, अक्षमाला, खड्ग अशी हत्यारे आहेत. डोक्यावर मुकुट, गळ्यात दागिने, पोटाशी उदरबंध, खांद्यावर वनमाला, कमरेला मेखला आहे. महादेवाने आपल्या उजव्या पायाने राक्षसाला मारले तुडवले असून डावा पाय हवेत आहे. राक्षसाच्या हातात तलवार व ढाल असून त्याचे डोळे आणि दोन दात बाहेर आहेत. शेजारी एक सुंदर नंदी असून तो राक्षसाच्या अंगावर उभा आहे.
दुसरे शिल्प बेलूर मधील आहे.
![]() |
| बेलूर |
हे शिल्प एका कोनाड्यात असून महादेव आठ हातांचे आहेत. इतर सर्व लक्षण वर सांगितल्या प्रमाणे आहेत. महादेवाच्या वर इतर शक्ती व देवता दाखविल्या आहेत.
तिसरे शिल्प पटदक्कल येथील असून शिल्पाची झिज झाली आहे.
![]() |
| पटदक्कल |
ही मूर्ती देखील आठ हातांची असून दोन हातात त्रिशूळ असून इतर सर्व हात विविध मुद्रेत आहेत. पायाशी योगेश्वरी नावाची शिवाची शक्ती आहे जी अंधकासूराचे रक्त पित आहे. शिवाचा डावा पाय रक्षासावर असून उजवा पाय जमिनीवर आहे. गळ्यात मुंडमाला असून कमरेला वस्त्र आहे.
कथा
हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु चा वध अनुक्रमे वराह आणि नृसिंह या विष्णु अवतारांनी केला. हिरण्यकश्यपू चा पुत्र प्रल्हाद याने वडिलांच्या राज्याचा त्याग करून विष्णु भक्तीचा मार्ग स्वीकारला. प्रल्हादाच्या नंतर अंधकासुराचे असुरांवर राज्य सुरु झाले. त्याने आपल्या तपश्चर्येने ब्रह्माला प्रसन्न करुन घेतले आणि विविध वर प्राप्त केले, आणि त्याने देवांना त्रास देणे सुरु केले. त्याच्या त्रासाने कंटाळलेले इंद्र शिवाकडे गेला, तोच पार्वती ला पळवून नेण्यासाठी अंधकासूर देखील तेथे पोहोचला. शिवाने त्याच्याशी युद्ध करण्याचा विचार केला आणि त्यासाठी तात्काळ वासुकी, धनंजय व तक्षक नावाच्या नागांची रचना केली. त्याचवेळी नील नावाचा असूर गजरुपात शिवाला मारण्यासाठी तेथे पोहोचला. ही गोष्ट नंदीला समजली व त्याने वीरभद्रला सांगितले. वीरभद्राने नीलचा वध करुन त्याचे कातडे शिवाला प्रदान केले. हे कातडे धारण करुन वासुकी, तक्षक व धनंजय नावाच्या नागांनी अलंकृत, त्रिशूल हातात घेऊन शिवाने अंधकासुराच्या वधासाठी प्रस्थान केले. शिवाने अंधकासुराला त्रिशूळ मारले पण त्याच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबापासून एक असूर उत्पन्न होत होता. असे हजारो अंधकासूर उत्पन्न झाले. विष्णूने आपल्या चक्राने बरेच अंधकासुर मारले पण त्याने काही उपयोग होत नव्हता. शिवाने रक्त जमिनीवर पडू नये म्हणून आपल्या ज्वालातून योगेश्वरी नावाच्या शक्तीची रचना केली. ही योगेश्वरी अंधकासुराच्या शरीरातील रक्त बाहेर येताच पीत होती. शिवाने देखील आपल्या एका हातात भांडे घेतले व त्यात रक्त जमा केले. ईतर देवतांनी देखील आपआपल्या शक्ती निर्माण करून शिवाच्या मदतीला पाठविल्या, जसे ब्रम्हाची शक्ती ब्रम्हाणी, वराहाची वाराही, वरुणाची वारूणी इत्यादी. याच त्या सप्तमातृका. अशा प्रकारे अंधकासुराचा वध करण्याच्या कार्यात शिवाला, योगेश्वरी महाशक्ती बरोबरच ब्रम्हाणी आदि सप्तमातृकांचेही सहकार्य मिळाले.



0 टिप्पण्या