चाणक्य म्हणतात,
चतुर्दिशं जनपदान्ते सांपरायिकं दैवकृतं दुर्ग कारवैत्
अन्तर्द्वीपंस्थलं वा निम्नावरुद्धमौदकम्
अर्थात, चारही दिशांना निसर्गाने बनविलेले, युद्धासाठी सज्ज असे दुर्ग निर्माण करावे. पाण्याने वेढलेले किंवा बेटावर असणारे दुर्ग म्हणजे जलदुर्ग स्थापन करावे.
शिवराजेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग |
याच धर्तीवर, रामचंद्रपंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात म्हणतात
'आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. जसे ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरता आरमार अवश्यमेव करावे.....त्याचे प्रत्यक प्रत्यक सुभे करावे. दरसुभे यास पांच गुराबा, पांढरा गलबते करून द्यावी'
राजापुरात इंग्रजांनी थैमान मांडलं होत, मुरुड जवळ सिद्धी होताच, मुरगाव जवळ पोर्तुगीज आणि वेंगुर्ल्यात डच. इथे प्रजा परकियांच्या अत्याचाराने त्रासली होती. जंजिऱ्याच्या आजूबाजूला सिद्धीची जहाज स्वैरसंचार करत होती. यांची जमिनीवरील रसद तोडली तरी समुद्रातील वाटा यांना रिकाम्या होत्या. शिवरायांनी ओळखलं होत, यांच्यावर जरब बसवायची तर समुद्र ताब्यात हवा आणि त्यासाठी समुद्रात किल्ले उभारावे लागणार. तयारी सुरू झाली ती योग्य जागा शोधण्यासाठी आणि नजर गेली ती मालवण जवळ असणाऱ्या एक बेटावर. त्याची विचारपूस झाल्यावर समजले की त्याचे नाव 'कुरटे बेट'. इथे किल्ला बांधला तर बऱ्याच गोष्टी साधणार होत्या जस की इथून जवळ गोवा आहे त्यामुळं पोर्तुगीजांच्या हालचालींवर नजर ठेवता येणार होती. इथे येणे पण सोपे नव्हते कारण या बेटाच्या आसपास पाण्यात खडक असल्याने मोठी जहाज इथ येऊ शकतं नाहीत तसेच लहान जहाजांना वेढे मारतच यावं लागतं. या नव्हे अशा अनेक कारणांमुळे ही जागा उत्तम होती.
सिंधुदूर्ग |
कुरटे बेटाचे महत्त्व चिटणीस बखरीतुन उत्तमरीत्या समजते.
"चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजीरा, जगी अस्मानी तारा. जैसे मंदिराचे मंडन श्रीतुलसी वृंदावन. राज्याचा भूषणप्रद अलंकार. चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले."
१६६४ मध्ये शिवरायांनी सुरत बदसुरत केली म्हणजे लुटली आणि मुघलांना धक्का दिला. हीच संपत्ती सिंधुदुर्गाच्या बांधकामात वापरली जाणार होती.
१६६४ मधील नोव्हेंबर महिना, मालवण जवळ मोरयाचा धोंडा म्हणून एक जागा आहे तिथे गणेश पूजन झाले आणि शिवरायांनी कुरटे बेटावर जाऊन सिंधुदुर्गाचा पहिला चिरा बसविला. आणि त्यानंतर बघता बघता तब्बल ४२ बुरुजांनी युक्त आणि १० मीटर उंचीची व ४ किलोमीटर लांबीची तटबंदी उभी राहिली. त्यात ४० शौचकूप, ४२ जिने आणि किल्ल्यात इतर वास्तू उभारल्या.
तटबंदी |
बुरुज |
गडाच्या कामावर शिवरायांचे बारीक लक्ष होते. कामाला सुरवात करण्याआधी शिवरायांनी एक सुचनावजा पत्र लिहले
"आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावले असे हे बरे जाणणे. अवधे काम चखोट करणे, माणसे नवी आहे ती त्यास सांभाळोन इत्येकांचा उपेग करोन घेणे. पाया बहुत भला रुंद घेणे, खाली अवघा कातळ तरी वरी थोर इमारत तस्माद दो बाजूस दोन हात जागा सोडोन तर उभारता ये इतकी रुंदी घेणे, तर कोठे रुंद तर कोठे जाग जागा अरुंद येणेप्रमाणे धरावा लागतो. अनुकूल दिसेल त्याप्रमाणे करणे. पायात ओतण्यापायी शिसे धाडायची व्यवस्था केली असे. नीट पाहोन मोजोन माल ताब्यात घेणे. टोपीकर साहुकार लवाड जात. डोळीयातील काजळ चोरून नेतील. पत्ता लागो देणार नाहीत. पुन:त्परतोन त्या कामाचा रोजमुरा मागतील. सावध असणे. गोडे पाणी हाताशी बहुत. पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधोन त्यात वाळू साठविणे. गोड्या पाण्यामध्ये चारदोनदा भिजू देणे. खारटाण धुतले जाईल. ती धुतलेली वापरणे. चुनखडी घाटावरोन पाठवीत असो. बरी तपासोन घेत जाणे. मिसळ असणार नाही. तरी सावध असणे उत्तम. रोजमुरा हररोज देणे जाणे, त्यास किमपि प्रश्नच न देणे."
सिंधुदुर्ग ही समुद्रातील राजधानी बनली होती ज्याच्या रक्षणासाठी पद्मगड, रामदुर्ग, राजकोट, सर्जेकोट असे किल्ले उभारले.
शिवराजेश्वर मंदिर |
राणीची वेळा |
१७०८ मधील वारणेच्या तहानंतर करवीर आणि सातारा अशा दोन गाद्या निर्माण झाल्या पैकी करवीरकर छत्रपतींकडे सिंधुदुर्ग गेला. पुढे इंग्रजांनी हा गड जिंकून याचे नाव 'फोर्ट ऑगस्टस' असे केले. ईस्ट इंडिया कंपनी आणि राणी जिजाबाई यांच्यात जानेवारी १७६६ साली जो करार झाला त्यानुसार ७ लाख रुपयांत इंग्रजांना मालवण मध्ये वखार उघडण्यास परवानगी दिली व त्या बदल्यात मराठ्यांनी सिंधुदुर्ग वर आपली सत्ता परत प्रस्थापित केली.
किल्ल्यात शिवरायांचं मंदिर आहे जे त्यांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम यांनी बांधले. येथील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती विना दाढी असून कोळ्याच्या रूपातील आहे. गळ्यात कंठा, मनगटात कडे, पायात तोडे, कमरेला तुमान आणि प्रभावळीत चंद्र, सुरू मोर्चेल कोरलेले आहे. तटात दोन घुमट्या असून एकीत शिवरायांच्या डाव्या पायाचा तर दुसरीत उजव्या हाताचा ठसा उमटविला आहे. गडावर पूर्वी एक नारळाचे झाड होते ज्याला दोन फांद्या होत्या.
3 टिप्पण्या
Informative....
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा🙏🏼👌🏻👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवा