Ticker

6/recent/ticker-posts

वास्तुपुरुष | स्थापत्यशास्त्रातील एक महत्वाचे चरण

वास्तु कोणतीही असो, बांधकामापूर्वी तिथे वास्तु पुरुषाचे विधिवत पूजन करणे जरुरी असते. वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तुसाठी योग्य जमीन निवडणे, भूमी परीक्षण करणे जितकं महत्वाचं आहे तितकेच वास्तुपुरुषाचे पूजन त्याच्या सध्य स्थितीनुसार करणे गरजेचे आहे. पूजन चुकीच्या पद्धतीने झाल्यास वास्तु निष्फळ ठरते.


वास्तुपुरुषाची उत्पत्ती

याविषयी मत्स्य पुराणात कथा आहे ती पुढीलप्रमाणे

महादेव आणि अंधकासुर यांच्यात खूप काळ युद्ध सुरू होते. त्यादरम्यान जेंव्हा महादेव थकले तेंव्हा त्यांच्या घामातून एक राक्षस उत्पन्न झाला जो दिसायला अक्राळविक्राळ आणि भयावह होता. त्याची भूक काही केल्या शमत नव्हती तेंव्हा, महादेवाने त्याच्यावर अनुग्रह केला. त्याला हवी ती प्रत्येक गोष्ट तो खाऊ शकतो असा वर मिळाला. त्यानंतर भुकेच्या आहारी जाऊन पृथ्वी खाण्यास तो पुरुष सरसावला. यामुळे भयभीत झालेल्या देवांनी महादेवाचा धावा केला. महादेवाच्या उपदेशानुसार सर्व देवांनी या पुरुषाला वीस दोऱ्यांच्या साहाय्याने जमिनीकडे तोंड करून खाली पाडले आणि त्याच्या गुडघ्यावर, पायावर व कोपरांवर ते बसले. त्याच्या अंगावर ४५ देव बसले व बाजूला ८ देवी बसल्या.

वास्तुपुरुष vastupurush 12
वास्तुपुरुष 


अधोमुखेन विज्ञप्तैस्त्रिदशैर्विहितो बलिः ।

तेनैव बलिना शान्ति कुरुते हानिमन्यथा ॥

प्रासाद भवनादीनां प्रारंभ परिवर्तने ।

वास्तुकर्मसु सर्वेषु पूजितः सौख्यदो भवेत् ॥

अर्थात

खाली तोंड असलेल्या त्या भुताला बळी मिळावा अशी मान्यता देवांनी दिली तेव्हा त्याला बळी देऊन त्याची शांती करावी न केल्यास हानी होते.

प्रासाद भवन इत्यादि वास्तू बांधावयास सुरुवात करताना किंवा त्यात बदल करावयाच्या अगोदर त्याची पूजा केल्यास ती वास्तू सौख्यदायक होते.


सर्व देव तेथे वास करतात म्हणून त्याला वास्तु म्हणायचे. जेंव्हा देव त्याच्या शरीरावर बसले तेंव्हा त्याचे डोके ईशान्येला तर पाय नैऋत्येला होते. नंतर त्या पुरुषाने ब्रह्मदेवाचा धावा केला आणि ब्रह्मदेवाला विचारले की मी असा किती काळ राहणार? त्यावर उत्तर मिळाले की तू सदैव तसाच राहशील पण दर ३ महिन्यांनी तुझी स्थिती बदलेल. हाच तो वास्तु पुरुष.

याच आशयाच्या कथा थोड्याफार फरकाने इतरत्रही वाचावयास भेटतात.

कोणती देवता वास्तुपुरुषाच्या अंगावर नक्की कुठे विराजमान झाली ते पाहू.

वास्तुपुरुषाच्या डोक्यावर महादेव असतो. उजव्या कानापाशी पर्जन्य असतो. उजव्या खांद्याजवळ जय असून महेन्द्र, सूर्य, सत्य, भृश व आकाश हे पाच देव हातावर असतात.

उजव्या गुडघ्यापाशी अग्नी असून पूषा, वितब, गृहक्षत राम, गंधर्व, भृंगराज व मृग हे सात देव उजव्या पायाच्या नळीजवळ असतात. डाव्या पायापाशी पितर असून तेथून डाव्या पायाच्या नळीवर दौवारिक, सुग्रीव, पुष्पदन्त, वरुण, असुर, शोष, यक्ष्मा हे सात देव असतात. डाव्या गुडघ्यावर रोगदेव स्थापित असतो तर नाग, मुख्य, भल्लाट सोम व अंगिरा हे डाव्या हातावर असतात.

डाव्या कानावर दिती असून तिच्या खालच्या पदांत अदिति असते. बाहेरच्या कोष्टात ३२ देव असून नाभीच्या पाठीमागच्या बाजूला ब्रह्मदेव असतो. उजव्या स्तनापाशी अर्यमा व डाव्या स्तनापाशी पृथवीधर असतो. विवस्वान व मित्र हे अनुक्रमे उजव्या व डाव्या मांडीवर असतात.

आप वास्तुपुरुषाच्या तळहातावर तर आपवत्स हृदयावर असतो. त्याचप्रमाणे सावित्र व सविता उजव्या हातावर असतात. इन्द्र इन्द्रजय मेड्रावर असून रुद्र त्याच्या डाव्या हातावर असतो.बाहेर ईशान्येला चरकी, पूर्व दिशेला पिलिपिच्छ, आग्नेय कोपऱ्यात विदारिका व दक्षिण दिशेला विजृम्भा असते. नैऋत्य दिशेला पूतना, पश्चिमेला स्कन्द वायव्य कोपऱ्यात पापराक्षसी असते. उत्तरेला अर्यमा असते.

पदमंडल


रुद्रदासोऽपि तत्रैव इति वेदमयं वपुः ॥

अशा रितीने त्या वास्तुपुरुषाचे शरीर वेद देव मय झालेले आहे.

या प्रत्येक देवतेची पूजा कोणत्या पदार्थाने करावी याचे विस्तृत संकेत शास्त्रात मिळतात परंतु आपण येथे ते थोडक्यात पाहू

देवि क्ररान्ममन्दीश्च माषात्रैः सुरयामिषैः।

अपरात् वृकानैश्च सर्वान् स्वर्णसुगन्धिभिः ||

म्हणजेच,

देवी व यम इत्यादी क्रूर देवांना उडदाचे पदार्थ व मांस द्यावेत. इतर सर्व देवांना तूप व पक्वान्ने तसेच सोने व सुगंधी पदार्थ देऊन त्यांची पूजा करावी.


असा हा वास्तुपुरुष स्थापत्यशास्त्रात महत्वाची भूमिका बजावतो. तो आपल्या वास्तूचे रक्षण करतो आणि तिथे वास करणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्रास सुख शांती प्रदान करतो.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या